Wednesday, November 26, 2008

मेघ आषाढातही आटेल आता

मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता

काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता

पेच माझी ’मी’ पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!

साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता

सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता

जन्मत: मी फाटका होतो तसाही
शोक का मग जर कफ़न फाटेल आता?

मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?

तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता

जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता

Tuesday, September 9, 2008

जिंदगी

जशी जिंदगी ढळू लागली
काळसावली छळू लागली

कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली

शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली

गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली

अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली

Wednesday, August 13, 2008

यथेच्छ खातेस ऐकतो...

प्रेरणा : वैभव ची अतिशय नितांत सुंदर गझल 'सुखात आहेस ऐकतो'

मूळ गझल :

सुखात आहेस ऐकतो ! हे कसे जमवतेस सांग ना!
तुडुंब डोळ्यामधील पाणी कुठे लपवतेस सांग ना !

अजून गेली नसेल ना ती रुसावयाची सवय तुझी?
कुणी न समजावता मनाला कसे हसवतेस सांग ना!

अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना आरशामधे
कुणास पाहून लाज-या पापण्या झुकवतेस सांग ना!

नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला जरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस सांग ना!

मधेच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा
अशा क्षणी एकसंधशी तू किती उसवतेस सांग ना!

खरोखरी जर तुला तहाचा नसेल संदेश द्यायचा
धुकेजलेल्या दिशांवरी नाव का गिरवतेस सांग ना!

खड्या पहा-यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला
स्वतःस माझ्याविना जगाया कधी शिकवतेस सांग ना!

--------------

यथेच्छ खातेस ऐकतो हे कसे जमवतेस सांग ना
तुडुंब पोटामधील खाणे कुठे लपवतेस सांग ना

अजून गेली नसेल ना ती चरावयाची सवय तुझी?
म्हशींप्रमाणे रवंथ करुनी कसे पचवतेस सांग ना!

अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना ह्या घरामधे
किलोकिलोने कश्यास ह्या कोंबड्या शिजवतेस सांग ना

नव्या नव्या गोड जिन्नसांची ददात नाही तुला जरी
कशास ताटामधे शिरा कालचा मिरवतेस सांग ना

परात चापून लाडवांची भरून जाते पोट तरी
अश्याच त्यावर सहस्त्र जिलब्या कश्या रिचवतेस सांग ना!

खरोखरी जर तुला न खाता उपास आहे करायचा
भुकेजले पोट, त्यावरी हात का फिरवतेस सांग ना

बका बका खाउनी तुझे हे शरीर फुगले फुग्यापरी
कशास हत्तीस त्या बिचाऱ्या उगी भिववतेस सांग ना

Friday, August 1, 2008

परत पाठीमागे

मूळ गझल माझीच गझल पाठीमागे

सरदाराचे ’हात’ बांधले पाठीमागे
स्वत:च डावे उलटे पडले पाठीमागे

जरा कुठे तो शाहिद विद्येसोबत दिसला
पेव कसे अफवांचे फुटले पाठीमागे

पाठ फिरविली तिने जरी माधुरी प्रमाणे
केस मोकळे हाय सोडले पाठीमागे

लाडिक हसुनी मला आपल्या घरीच नेले
अन गेल्यावर श्वान सोडले पाठीमागे

’वॉल’ खरे तर जगात साऱ्या अभेद्य होती
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे

पळता भुइ का थोडी झाली विरोत्तमांना
श्रीलंकेचे वाघ लागले पाठीमागे

थोबड्यावरी डाग तिच्या पण पसंत केली
ठेवून गेला बाप बंगले पाठीमागे

भकारातही 'ह्यांच्या' होता एक दिलासा
त्यात तरी ’हे’ नाही पडले पाठीमागे

जीवनभर तर त्याने माझी सोबत केली
मी गेल्यावर मद्य सांडले पाठीमागे

Monday, July 21, 2008

पाठीमागे

पाठीमागे

वळणावरती पाऊल वळले पाठीमागे
दोघांमधले नाते पडले पाठीमागे

मेघ जरासे डोंगरमाथा चुंबत गेले
आठवणींचे निर्झर झरले पाठीमागे

तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
तो गेला अन मन भरकटले पाठीमागे

सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?

नकारातही तिच्या मिळाला एक दिलासा
जाता जाता तिने बघितले पाठीमागे

आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?

Wednesday, May 28, 2008

रिक्षा की... शिक्षा?

पुण्यातल्या रिक्षा आणि त्यांचे ’थोर’ चालक ह्याविषयी खूप बोलून किंवा लिहून झाले आहे. अगदी माझ्या लहानपणापासून पुणेकर जनता ज्या भक्तीभावाने पालख्यांचे स्वागत करते अगदी तेवढ्याच भक्तीभावाने रिक्षावाल्यांना जोडे आणि ’जोडीने’ ( कोटी अपेक्षित ) शालजोडीतले मारत आली आहे. राजकारण, क्रिकेट आणि खड्डे ह्यांच्याएवढा रिक्षावाला हा आवडीचा विषय नसला तरी पण तो बऱ्यापेकी टीआरपी कायमच बाळगून आहे.

आईनस्टाईनने म्हणले आहे की "When you are courting a nice girl an hour seems like a second. but when you sit on a red-hot cinder a second seems like an hour. That's relativity." (काहीजण असेही म्हणू शकतात - "When you are courting a nice girl an hour seems like a second. but when you are with your wife, a second seems like an hour) मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष आहे. त्यामुळे गेले दोन-तीन वेळा बंगलोर मधल्या रिक्षावाल्यांचा अनुभव घेतल्यावर जे पुण्यातले रिक्षावाले पूर्वी यमदूत भासायचे ते आता मला देवदूत भासू लागले आहेत.

आ हा हा!!! काय त्यांचा तो बंगलोरी रुबाब! (लखनौवी नबाब च्या चालीवर ) विचारु नका! मळका खाकी ड्रेस, खांद्यावर एखादा तेवढाच कळकट्ट फडका, तोंडात रजनीकांत स्टाईल सिगारेट, कुठल्यातरी अती किळसवाण्या, जाड्या, ढोल्या साऊथ इंडियन हिरो सारखी केसांची झुलपे, जोडीला कर्णकर्कश्श गाणी आणि जणू मर्सिडीजच चालवत आहोत असा चेहयावरती माज. आपण गिऱ्हाईकाला रिक्षात बसवतो म्हणजे त्याने (म्हणजे गिऱ्हाईकाने) गेल्या जन्मी काही पुण्य केले असावे अश्या भावनेनेच ते गिऱ्हाईकाला रिक्षात बसवतात. गिऱ्हाईक बिचारे... बसमध्ये घुसवत नाही आणि रीक मध्ये बसवत नाही अशी त्याची अवस्था असते.

मिटर टाकणे तर बंगलोरमध्ये कायद्याने गुन्हाऽऽ च आहे. आणि मिटर टाक असे सांगण्याऱ्या गिऱ्हाईकाला फाशी दिले जात असावे असा माझा समज आहे. ’मीटर टाको भैया’ (हे माझे हिंदी बरं कां) असे म्हणले की गांगुलीला जर तो कप्तान असताना कुणी सांगितले असते की रनर म्हणून जा जरा... तर त्याने कसे त्या माणसाकडे बघितले असते तसा चेहरा करुन ते आपल्याकडे बघतात... मग आपलाच मिटर डाउन होतो आणि आपण चुपचाप विचारतो कितना लेगा?
ह्यावर रोज तुम्ही जाणारे ठिकाण अगदी तेच असले तरी रोज ह्याचे उत्तर वेगळे असते. मटक्याचा आकडा कसा बदलत असतो तसा हा आकडा रिक्षावाल्यांच्या मर्जीनुसार बदलत असतो. (मला तर ते एखादे random numer generator program वापरतात की काय अशी शंका आहे. म्हणजे मिटर ने किती होतील ह्याचा आकडा काढायचा आणि त्याला त्या random no ने गुणायचे. नक्कीच एकाद्या सॉफ्टवेअर वाल्या गिऱ्हाईकाला मीटर प्रमाणे भाडे घेउन त्या बदल्यात असा प्रोग्रॅम लिहून घेतला असावा.)

पुण्यात रात्री अकरानंतर दिडपट भाडे घेतात. बंगलोरच्या रिक्षावाल्यांना हा भेदभाव मान्यच नाही मुळी. रात्री प्रवास करणाया गिऱ्हाईकावर का उगाच अन्याय म्हणून ते अगदी सकाळी आठ वाजल्यापासूनच दिडपट ते दुप्पट भाडे आकारायला लागतात. दोनच महिन्यात हे त्यांनी माझ्या इतके अंगवळणी पाडले की एकदा एका रिक्षावाल्याने भाड्यापेक्षा फक्त दहा रुपये जास्त घेतले तर त्याच्या रिक्षातून उतरावेसे वाटेना मला. त्याला बहुतेक 'चढली' असावी.

माझ्या गेल्या काही बंगलोर भेटीत मला किती नमुने भेटले म्हणून सांगू? गेल्या दहा वर्षात मायबोलीवरही एवढे नमुने पाहिले नसतील.

दोन बसच्या मधून रिक्षा घालणारा, कितीही नाकदुऱ्या काढल्या तरी कुठेही न येणारा रिक्षावाला, ऐकून न ऐकल्यासारखे करणारा, गिऱ्हाईकाला कन्नड समजत नाही हे समजत असूनही मुद्दाम कन्नड बोलणारा, जोरात दामटणारा, कर्णकर्कश्श गाणी लावून बिड्या फुकत रिक्षा चालवणारा, रिक्षा मध्येच थांबवून पाणीपुरी खाणारा... असे अनेक नमुनेदार रिक्षावाले मी आतापर्यंत पाहिलेत.

ह्यात सगळ्यात कहर म्हणजे दोन बसमधून रिक्षा घालणारा. कोरमंगला ते एंबसी गोल्फ़ लिंक असा 'स्वर्गीय' प्रवास (स्वर्गीय म्हणायचे कारण घडोघडी स्वर्ग अगदी शब्दश: दोन बोटांवर आल्याचा भास होतो आपल्याला), दोन बस अगदी एकमेकांना खेटून उभ्या म्हणजे किती खेटून उभ्या असाव्यात त्या तर पुण्यातल्या गाडगीळ पुलावर बाईकच्या आडोश्याला प्रेमीवीर जितके खेटून बसतात ना अगदी तितक्या खेटून आणि त्या दोन्हीमधून ह्या पठ्याने रिक्षा अशी काढली ना की बाऽस! रजनीकांतच्या सिनेमात सुद्धा असला स्टंट मी कधी पाहिला नव्हता (Truth is stranger than fiction असे म्हणतात ते अगदी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले). रजनीकांत जसा आधी बंगलोरमध्ये बस कंडक्टर होता आणि मग सुपरस्टार बनला तसाच हा रिक्षावाला सुद्धा कुणी चंद्रकांत वगैरे होऊन त्याचा वारसा चालवणार असे मला चाटून (आपले वाटून) गेले... बघा वाटून चे चुकुन चाटून झाले हा बंगलोरच्या रिक्षाप्रवासाचाच परीणाम.. दुसरे काय?
एक क्षण माझ्या डोळ्यासमोर दृष्य तरळले की बंगलोरची बस नेहमीप्रमाणेच खचाखच भरली आहे. बसमध्ये रजनीकांत आपली झुलपे मागे उडवत, तिकिट ठेवायच्या पेटीतूनच सिगारेट उडवून तोंडात झेलत आहे आणि पंच करायच्या त्या स्टेपलरनेच ती पेटवत आहे आणि पब्लिकला ’मुंद बनि, मुंद बनि’ (पुढे सरका) असे ओरडत सांगत आहे. पुढची तिकिटे काढून झाली की बस मध्ये जागा नसल्याने तो सरळ चालत्या बसच्या टपावरुन मागे जाऊन मागची तिकिटे फाडत आहे वगैरे वगैरे वगैरे....

एकदा असेच सकाळी ८ वाजता रिक्षात बसलो. ( हो हो बंगलोरला असलो की माझे लवकर आवरते. का ते सूज्ञास सांगणे न लगे!) रोजचा जायचा मार्ग तोच त्यामुळे रस्ता माहित होता. रिक्षावालाही चक्क फक्त दीडपट भाड्यात तयार झाला म्हणून मी खुशीतच होतो. एवढ्यात महाशयांनी घातली की रिक्षा कुठल्यातरी बोळात. मी ओरडून सांगतोय अहो इकडून नाही तिकडून जायचेय तर हा आपला काहीतरी कन्नड मधून झाला सुरु. त्याला हिंदी येत नव्हते (म्हणे) आणि मला कन्नड येत नाही (खरेच) ह्या गोंधळात बिनधास्त रिंग रोड च्या दुसऱ्या बाजूने घेउन गेला आणि ज्या अंतराला ३० रुपये लागले असते त्याला चक्क ९० रुपये की हो लागले आणि मला कन्नड मिश्रित हिंदी बोलून वेड लागायची पाळी आली. त्याच्याशी भांडायचा खूप प्रयत्न केला (आता इथे बायको नक्की म्हणेल तुम्ही? ... आणि भांडणार? ) तर जेवढे भांडायला येते तेवढा प्रयत्न केला पण त्या रिक्षावाल्याने असा आवाज चढवला की माझ्या जीवाचे पार पाणी पाणी झाले आणि शेवटी ९० रुपयांवर पाणी सोडावेच लागले.

प्रसंग दुसरा, मार्ग तोच(तोच), वेळ तीच गर्दीची (बंगलोरमध्ये कुठलीही वेळ गर्दीचीच असते) रिक्षावाला तोच नाही पण तसलाच... हाही फक्त दिडपट भाड्यात तयार झाला. मागचा अनुभव गाठीशी असल्याने मी एकदम तयारीत बसलो. आणि साहेब चुकीच्या दिशेने गाडी वळविणार एवढ्यात त्यांना थांबवून कसेतरी योग्य दिशेने घ्यायला सांगितले... झाले साहेबांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्याने जे काही कन्नड मधून बडबड सुरु केली. येण माडती! हाण झाडती! कान काढती!’ काय काय बोलत होता कुणास ठाउक? कन्नड येत नसले तरी मला एवढे नक्कीच कळत होते की ते व्यंकटेश्वर स्तोत्र वगैरे नक्कीच नसणार.. ती कन्नड मधली ’भ’ ची बाराखडीच असावी... ऐकून ऐकून कान किटले. हा 'हिमेश' चा कन्नड अवतार असावा असा समज करुन मी बिचारा गप्प बसलो. ’रेशमियाच्या गाण्यांनी’ हे विडंबन सुचायची प्रेरणा हा त्या रिक्षावाल्याचा आवाजच होता

अजून एक असाच नमुना... दुसऱ्या ऑफिसमध्ये ५ वाजता मिटींग होती म्हणून नेहमीच्या ऑफिसमधून चार वाजताच निघालो... म्हणले महत्वाच्या मिटींगला (तरी) वेळेवर जावे. नेहमीप्रमाणेच देवाचा धावा करतच रिक्षात बसलो. बंगलोर च्या रिक्षात बसताना नित्यनेमाने देवाचा धावा करावाच लागतो. अजून थोड्या चकरा जर मी बंगलोरला मारल्या तर देव नक्की प्रसन्न ह्यायचा मला... बर ते असो...
थोडे अंतर सगळे सुरळीत पार पडले आणि मध्येच रिक्षावाल्याला काय हुक्की आली कुणास ठाऊक रिक्षा जरा बाजूला थांबवली, मला कन्नड मध्ये काहीतरी सांगितल्यासारखे केले आणि बाजूच्या बोळात गायब प्राणी. पाच एक मिनिटे झाली तरी स्वारी गायबच... बर रिक्षा थांबवली अश्या जागी होती की दुसरी रिक्षा करायची म्हणली तर रिकामी रिक्षाच काय तिचे चाक सुद्धा दॄष्टीस पडेना. शेवटी चडफडत आणि जंटलमनला साजेश्या अश्या साजूक तुपातल्या शिव्या घालत मी त्याला शोधायला म्हणून बोळात घुसलो आणि समोरचे दॄश्य बघुन ’चाट’च पडलो. एवढा आश्चर्यचकित मी माझा 'M3' (एकदाचा) सुटला तेव्हा सुद्धा झालो नव्हतो. साहेब काय करत असतील?... तर चक्क ठेल्यावर उभे राहून मजेत चाट आणि पाणी पुरी खात होते.
मी जाऊन त्याला झापला तर म्हणतो कसा (अर्थात त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदीत) "साहेब इथली पाणीपुरी लै खास असते बघा. तुम्ही पण खाणार का? फक्त पाच रुपये." तुम्हालाही परवडेल असे म्हणायचे असावे त्याला. (मी कुठल्या कंपनीत काम करतो हे त्याला कळले असणारच ना). इथली पाणीपुरी आठवली आणि तोंडाला पाणी सुटले बघा. ह्याच्या तोंडाला पाणी सुटले ठीक आहे पण माझ्या तोंडचे पाणी पळाले त्याचे काय?

तर हे असले एक एक इरसाल नमुने. बंगलोरमध्ये रस्तोरस्ती असे रिक्षावाले भेटतच असतात आणि मला पार सळो की पळो करुन सोडतात त्यामुळे जेव्हा केव्हा मी बंगलोरहून पुण्याला पळतो (म्हणजे शब्दश: नाही), पुण्याच्या एअरपोर्ट वरुन घराकडे जायला रिक्षा करतो आणि जेव्हा तो रिक्षावाला मिटर टाकतो तेव्हा अगदी ’अगा म्या ब्रम्ह पाहिले’ अशी माझी अवस्था होते. ’मैं हू ना’ मध्ये नाही का सुश्मिता दिसली कि शाहरुखच्या कानात व्हायोलिन्स आणि सॅक्सोफोन वगैरे वाजू लागतात तसे माझ्या कानात टाळ, मॄदुंगां किंवा बासरी वाजायला लागते आणि तोंडातून शब्द बाहेर पडतात....

रिक्षा ही चांगली
शहरात शहर हे पुणे शहर, पाहण्या नजर भिरभिरते
देते न टांग, लावून रांग, ही वाट कुणाची बघते
ह्या गिऱ्हाईकाची साद ऐकुनी लगेच थांबत जाई
रिक्षा ही चांगली, पुण्याची रिक्षा ही चांगली

पी.एम.टी च्या रांगेतून, लाखो लोके सडताना
चिंब चिंब देहामधुनी घामट धारा गळताना
ही शेअर रिक्षा म्हणून आपुल्या मनास आवडून जाई
स्वस्तामध्ये साऱ्यांना ही घरी घेउनी जाई

ह्या गिऱ्हाईकाची साद ऐकुनी लगेच थांबत जाई
रिक्षा ही चांगली, पुण्याची रिक्षा ही चांगली

Thursday, May 22, 2008

मूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा

अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा
बहुतेक सुंदरीचा, तो चेहरा असावा

जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला
केलेत वार ज्याने तो वस्तरा असावा

सुंदर सुरेख मुखडा, डोळे किती टपोरे
आवाज हाय ’राणी’, का घोगरा असावा

पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा

बढती मला न मिळता त्याला कशी मिळाली
नक्कीच बॉसचा ह्या, तो सोयरा असावा

संतूर साबणाने न्हावे कशास राणी
वाटे तुझा गं भाऊ, जो छोकरा असावा

दिसते तसेच नसते, जग हे म्हणून फसते
वाटेल मोगरा जो, तो धोतरा असावा

रक्तामधे पसरते, साखर तुझ्या ’मिल्या’ही
दाही बश्या रव्याचा तो तर शिरा असावा

Friday, May 16, 2008

जीवघेणे

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर स्पंदनांचे
छेडतो मॄत्यू तराणे जीवघेणे

Thursday, April 17, 2008

तू

आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू

उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू

भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू

सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू

पाखरे निजती तुझ्या खांद्यावरी
स्वप्नं त्यांची फुलविणारी बाग तू

नाव जर भवसागरी तारायची
दु:ख ने! ओझे सुखाचे त्याग तू

शोध स्वत्वाचा तुला जर घ्यायचा
काढ माझ्या पावलांचा माग तू

Wednesday, February 20, 2008

हुंदका

मराठीगजल ह्या संकेतस्थळावर घेतलेल्या गजल कार्यशाळेत लिहीलेली ही 'तरही' गजल

हुंदका साधा तुझा सांगून गेला
भावनांचा बांध तो फ़ोडून गेला

अंतरीचा ग्रीष्म इतका तप्त होता
चांदण्यांचा स्पर्शही जाळून गेला

आसवांचे पावसाळे, नित्य झाले
मेघ काळा काळजा व्यापून गेला

कवडसा छोटा परी माझ्या नभाला
सप्तरंगी झुंबरे टांगून गेला

बोलणे झालेच नाही पण अबोला
आपल्यामधला दुवा सांधून गेला

मी यशाची सर्व शिखरे चढत असता
पाय खाली सोयरा खेचून गेला

ढोंग मी केले सुखाचे तुज समोरी
चेहरा माझा मला फ़सवून गेला

मानली ना हार श्वासांनी कधी पण;
श्वास मॄत्यूचा मला हरवून गेला

Friday, January 11, 2008

जवा खडूस पॉंटींग हा

मूळ गाणे

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
शेजारची ही काळी मैना लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट
..... ...... ..... .... ......... ......
पाहु नको ग मैनेचा झोका
लागतोय झुलायला
आता लागतोय झुलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

जोवर नव्हती मैनेला जोडी ऽ ऽ
खायाला देताना नाक, तोंड मोडी ऽ ऽ
राघुला पाहून, लाजून गाऊन
डाळींब सोलायला
लागली डाळींब सोलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

पोपट माझा घालतोय शीळ ऽ ऽ
मैनेची तिकडे होई तळमळ ऽ ऽ
संधी ती साधून, जाते धावून
पिंजरा तोडायला
तो पिंजरा तोडायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

पोपट माझा लै लै गुणी
साऱ्यांच्या तर तो भरलाय मनी
.... ... प्रेमाचा साज
लागतोय फुलायला
बघा लागतोय फुलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला

-------------------------------------------------
विडंबन

कल्चर जे त्याचं, तो त्यालाच जागला
ऑसी जसे वागती, तो तसाच वागला
नंदीबैलावानि बेन्सन बोट वर करायला
लागला बोट वर करायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला

काय सांगू तुला मी सिडनीची गोष्ट ऽ ऽ
बकनर नावाचा अंपायर खाष्ट ऽ ऽ
राहून गाफिल, प्रत्येक अपील
उचलून धरायला
लागला उचलून धरायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला

सायमंड्सने काढली भज्जीची खोड ऽ ऽ
उत्तरला भज्जीही तोडीस तोड ऽ ऽ
कसा मुजोर तो कांगारू चोर
लागला बोंबलायला
उलटा लागला बोंबलायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला

न्यायाचे नाटक प्रॉक्टर करं ऽ ऽ
उंदराला साक्षी मांजर गोरं ऽ ऽ
मद्य जणू प्याला, अशा मर्कटलीला
लागला करायला
गोरा लागला करायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला

जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला