Tuesday, November 24, 2009

नकार गर्भरेशमी

जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी

कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी

कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?

कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?

नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी

अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी

रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी

मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी

अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?

Wednesday, November 18, 2009

पादुका

कसे ठकविले जगास सार्‍या नको गर्व हा फुका
नशीब बेणे कधीतरी लावेल तुलाही थुका

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका

पैशापुढे न झुकतो कधिही स्वाभिमान आमुचा
त्यासाठी तर आणा भरुनी डॉलरने संदुका

नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (...) चा मुका

जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका

भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका

Monday, November 9, 2009

अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे

रोज का तुमच्याकडे पाऊस पैश्यांचा पडे?
अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे॥

घेउनी खांद्यावरी झेंडे सुखाचे नाचता
पावलांखाली अम्हाला अन्‌ मजेने दाबता
टोचले काटे म्हणत, काटाच अमुचा काढता
एकदा नाहीच तर वर्षानुवर्षे हे घडे
अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे॥

लागते टॉमीस तुमच्या रेशमाचे वस्त्र का?
मारण्या मुंगी तुम्हाला पाहिजे ब्रह्मास्त्र का?
'वापरा आहे म्हणोनी' हेच तुमचे शास्त्र का?
घास भरवायासही नोकर किती तुमच्याकडे?
अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे॥

ठेवता पाऊल खाली धन्य होते ही धरा
थुंकता थोडे तुम्ही भरतीच येते सागरा
दर्शनाला धाव घेती देवही तुमच्या घरा
श्वास घेता वाजती दाहीदिशांना चौघडे
अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे॥

भाकरी हिसकावली का आमच्या हातातुनी?
सावली अमुचीच पळते दूर अमुच्यापासुनी
रक्त अमुचे सांडपाणी! वाहते नाल्यातुनी
घेउनी फिरतो अता खांद्यावरी अपुले मढे
अंगणी पडतात अमुच्या फक्त अश्रूंचे सडे॥