Thursday, July 19, 2007

माऊसही

चाल : संदीपची गजल पाऊसही

तुझ्या माझ्यासवे बोलायचा माऊसही
तुझ्या ईमेलना, वाचायचा माऊसही

कधी याहूवरी मी जर तुझ्याशी भांडलो
कसा कीबोर्डला, झापायचा माऊसही

गुलाबी-गोड गोष्टी चॅटवर तुज सांगता
तुझ्या इतुकाच मग, लाजायचा माऊसही

उगा गुरकावली ती बॉस, तर नावे तिच्या
कशी बटणे तिन्ही, मोडायचा माऊसही

समोरच स्कर्टवाली सुंदरी जर बैसली
कसा हलकेच खाली, यायचा माऊसही

अचानक कोड माझा चालताना पाहुनी
पुन्हा क्लिक क्लिक असा, नाचायचा माऊसही

कसा मज साथ सुख-दु:खामध्ये तो द्यायचा
सदा दोस्ती अशी, निभवायचा माऊसही

Tuesday, July 10, 2007

रात नसता, प्रेत नसता

संदीपची अजून एक गज़ल, मेघ नसता वीज नसता चे हे विडंबन.

अर्थात एवढ्या romantic गझलेची अशी वाट लावल्याबद्दल संदीपची आणि त्याच्या पंख्यांची माफ़ी मागून

रात नसता, प्रेत नसता, भूत भासू लागले
जाहले इतकेच होते की तुला मी पाहिले

थोबडा भेसूर का हा पावडरिने रंगला
आरश्याला भिवविताना काल तुजला पाहिले

एवढा आकार देहाचा तुझ्या ह्या वाढला
बुरुज देखिल सिंहगडचे सूक्ष्म वाटू लागले

असुर लाखो जवळ असुनी दैत्यराजा हळहळे
दैत्यमाणिक हे तुझ्यासम मर्त्यलोकी राहिले

पाहुनी रंगास तुझिया कोळसा काळा पडे
शल्य हे त्याच्या उरातिल त्यास जाळू लागले

काळराती प्राक्तनाला दोष मी माझ्या दिला
शेवटी तुज धर्मपत्नी मज करावे लागले

Monday, July 9, 2007

World Cup मध्ये भारताचा दारुण पराभव झाला त्यावेळी भारतीय संघाचे वर्णन मला असे करावेसे वाटले होते

मूळ कविता : साहेब म्हणतो चेपेन चेपेन

लंका म्हणते चोपेन चोपेन...... बांगला म्हणतो चोपेन चोपेन
काळ मोठा... वेळ खोटी...... पब्लिक म्हणते चोपेन चोपेन

खेळले सारे मैदानावर, स्वप्नांची ह्या करुनी राख
लंकेच्या सिंहाला पाहून, शेळ्या झाले आमुचे वाघ
वाघ म्हणाले 'मास्तर'ला, दात नाहीत आम्हाला
शिकार कसली करतो आम्ही, नखे कुरतडत हारेन हारेन

बँटींग म्हणजे गमजा नुसत्या मोर्तजा ने काढले माप
मुरलीच्या फ़िरकीला पाहून, वाघांचा ह्या हो थरकाप
वळता थोडे फ़सती रे, 'दुसरे' पॅडवर बसती रे
बॅट म्हणते मारीन मारीन, हात म्हणती सोडेन सोडेन

आम्ही जगाला मारून डोळा भरतो आमची तुंबडी रे
हरण्याची मुळी पर्वा नाही, गेंड्याची जर कातडी रे
मैदानावर फ़ुटतो घाम, तरी वाढतो आमचा दाम
अर्थ म्हणतो पैसा पैसा, शब्द म्हणती कँपेन कँपेन

भज्जू, झहीर, आगरकरला, पडते का कधी विकेट रे
ह्या संघाचे झाले आहे, चेंडूवाचून क्रिकेट रे
इतके दारुण हरले रे, शेंबडे पोरही चिडले रे
पवार म्हणतो थांबा थांबा, जनता म्हणते बुकलेन बुलकेन

लंका म्हणते चोपेन चोपेन...... बांगला म्हणतो चोपेन चोपेन
काळ मोठा... वेळ खोटी...... पब्लिक म्हणते चोपेन चोपेन