Monday, July 21, 2008

पाठीमागे

पाठीमागे

वळणावरती पाऊल वळले पाठीमागे
दोघांमधले नाते पडले पाठीमागे

मेघ जरासे डोंगरमाथा चुंबत गेले
आठवणींचे निर्झर झरले पाठीमागे

तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
तो गेला अन मन भरकटले पाठीमागे

सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?

नकारातही तिच्या मिळाला एक दिलासा
जाता जाता तिने बघितले पाठीमागे

आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?

7 comments:

satyajit said...

तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

-- mast re...

vivek said...

मिलिंद,
छान आहे गझल.

विशेष आवडलेले शेर : पतंग, रंग, नकार आणि आरसा. मक्ताही छान.

"दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे" या मिसर्‍यात "सुख तिच्या धावले" हे वाचताना जरा खटकतंय. "सुख" आणि "धावले" मधे "तिच्या" आल्यामुळे.

नकाराचा शेर क्रमात वर चढवून "तिने अचानक" च्या नंतर लिहिलास तर त्याला अजून context मिळेल असं वाटतंय.

बाकी एकदम बढिया.

मिलिंद छत्रे said...

धन्यवाद सत्या आणि विवेक

विवेक : 'तिच्या' सुख आणि धावले च्या मध्ये आल्याने अडखळायला होतेय खरे...

पण context मुद्दाम द्यायचा नाहीये शेराला... आधीच्या शेराची छाया त्यावर पडायची शक्यता असते ना त्यामुळे...

Nash said...

सद्ध्या अवघड रदिफ घेऊन लिखाण करायचे असे ठरवलेले दिसते आहे ;-) आधी जीवघेणे आणि आता पाठीमागे...

आता उगीच आगाऊपण म्हणून detailed response :-)

मतला: ठिक. अगदी सहज म्हणून ’पडले’ आणि ’वळले’ interchange करून वाचले. एक वेगळीच अर्थ छटा आली....

दुसरा शेर: उला मिसरा अजून स्पष्ट करता येईल का असा विचार करतो आहे. म्हणजे पाठीमागे हा रदिफ justify करता येईल असे काही. मला तो ’जरासे’ शब्दही थोडा खटकतो आहे. तो 'just touching' ह्या अर्थाने तिथे येतो आहे हे समजते आहे पण... चुंबत ऐवजी चुंबुन केले तर? सानी मधे निर्झर झरले ऐवजी उरले असेही वाचले. तुला काय वाटते?

तिसरा शेर: मस्त... पण विवेक म्हणतात त्याप्रमाणे शब्दक्रम थोडा खटकतो.

चौथा शेर: इथे ’पाठीमागे’ निभावला गेला नाहीये असे वाटते. विचार करतो.

पाच सात आठ शेर: चांगले आहेत.

सहावा शेर: माझ्या मते हासील-ऐ-गझल. मस्त.

मिलिंद छत्रे said...

नचिकेत खूप आभार सविस्तर प्रतिक्रीयेबद्दल... सध्या एवढ्या सविस्तर प्रतिक्रीया कोणी देत नाहीये त्यामुळे शिकणे खुंटले आहे... ह्यानिमित्तने शिकणे होईल...

सद्ध्या अवघड रदिफ घेऊन लिखाण करायचे असे ठरवलेले दिसते आहे ;-)>>>तसे काही नाही रे.. जसे सुचेल तसे लिहितो...

मतला: ठिक. अगदी सहज म्हणून ’पडले’ आणि ’वळले’ interchange करून वाचले. एक वेगळीच अर्थ छटा आली....>> हम्म पाउल पडले हा विचार केलेला पण नाते वळले किंवा त्या जागी दुसरे काहीच योग्य वाटले नाही...


पण... चुंबत ऐवजी चुंबुन केले तर? >>> आधी मी पण चुंबुनच लिहीलेले होते पण चुंबून चे चुंबुन करुन सूट घेण्यापेक्षा जवळचा ’चुंबत’ शब्द वापरला...

सानी मधे निर्झर झरले ऐवजी उरले असेही वाचले. तुला काय वाटते? >>> अर्थ छ्टा बदलेल पण त्यामुळे...

फक्त आठवणी जवळ उरल्या असे म्हणण्यापेक्षा .. फक्त एक छोटीशी घट्ना घडली आणि आठवणिंचे झरे पाझरू लागले असे म्हणायचे आहे.

चौथ्यात पाठीमागे का निभावले गेले नाहीये असे वाटतेय? बालपण हातातून सुटले पण तरी पण मन त्याच आठवणीत भरकटलेय (रमलेय नाही)..

किंवा पतंगाची आणि माझी साथ तर सुटली अन सुटली नाहीही कारण मन त्याच्याच पाठीमागे भरकटले ... अशीही छ्टा येते...

Dk said...

मिल्याभाव, आवडली गझल! ह्या लिखाण प्रकारातल्या फार खाचाखोचा कळत नाहीत मला :( पण शिकायला आवडेल!
बाकी बालगीतही वाचली फार ग्रेट! :)

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

मिलिंद छत्रे said...

दीप : अनेक धन्यवाद...