Monday, October 8, 2007

माकडाचा मोबाईल

माकडाचा मोबाईल - एक बालगीत

एक माकड घेऊन आले एकदा मोबाईल
कलरफुल डिस्प्ले होता, लेटेस्ट होती स्टाईल

स्कीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान
रींगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान

माकड पुसे वापरायचाय का तुम्हाला हा फोन
एका कॉलला तीन रुपये एस. एम. एस. ला दोन

दुसऱ्या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर
रोमिंग तेवढे घेतले नाहीये, उगा खर्चात भर

अस्वल म्हणे वाट बघत असेल माझी हनी
फोन करतो 'आलोच मी' काढुन ठेव हनी

मनी आली मिशा चाटत घेउन पैसे नवे
'डायल ए मिल्क' कॉल करुन सांगते दूध हवे

कोल्हा म्हणला माकडदादा होतेय फार बोअर
एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर

ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार
अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार

कुत्रा बोले शेपुट हलवत सांगु का खरंच
आयडीआ का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना हच

इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत
पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत

माकड बोले घाबरु नका! पळताय काय असे?
युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे

हळुच त्याने बंदुकीचा ठो ठो रिंगटोन लावला
घाबरुन तेथुन वाघोबाने लागलीच पळ काढला

वाघोबाची फजिती बघुन हसु लागला जो तो
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ

Wednesday, October 3, 2007

दाटे धुराचे हे जाळे

चाल : फिटे अंधाराचे जाळे

दाटे धुराचे हे जाळे, झाले कोंदट आकाश
रस्त्यारस्त्यातून वाहे, एक कोंडणारा श्वास ॥

ओकी धूर गाड्या साऱ्या, आसमंत हा काळोखे
गावोगावी झाडांवर, पडती मॄत्यूचे विळखे
लाज लज्जा ही ना शिवते, आमच्या मनास मनास ।

वॄक्ष तोडुन झाले सारे, टेकड्याही विकून झाल्या
पाप जन्मता मनात, वाल्मिकीचा झाला वाल्या
जणु पैशाची ही खाण, लागे हातास हातास ।

लाच खाऊन रे मुकी, झाली मनपाची खाती
नदीपात्रामध्ये बांधू, रहायला स्वर्ग साती
धरु निसर्गाला दोषी, पूर आल्यास आल्यास ।

समुद्रही हटविला, 'मीठी'ला द्या मूठमाती
मात देऊ निसर्गाला, माणसाला चढे मस्ती
चाले विनाशाकडे रे त्याचा, सारा प्रवास प्रवास ।

दाटे धुराचे हे जाळे, झाले कोंदट आकाश
रस्त्यारस्त्यातून वाहे, एक कोंडणारा श्वास ॥