Wednesday, March 9, 2011

तू भेटली नव्हतीस तोवर

तू भेटली नव्हतीस तोवर चालले होते बरे
लक्षात नाही यायचे तेव्हा मनावरचे चरे

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

ईमेल, एसेमेस येती रोज पाचोळ्यापरी
गेली कुठे गंधाळलेली ती जुनी पत्रोत्तरे?

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

कुठल्या विचारांची तुझ्या डोक्यात दंगल माजली?
उध्वस्त झाल्या कल्पना नुसतीच उरली अक्षरे

तो श्वास होता कोणता गळफास ज्याने लावला?
तो भास नक्की कोणता... मी मानले ज्याला खरे?

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

Wednesday, November 24, 2010

दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते

रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते

सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते

शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते

चंद्र तार्‍यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते

ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?

Sunday, September 26, 2010

अंतरातली व्यथा अंतरी जपायची

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला ... मी तुला असायचो
रात्रभर दवांमधे आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती ... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा ... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची ... वेदना सुचायची

दिवस पाहिले असे ... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची

एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे ... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

Tuesday, May 11, 2010

मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सत्य आयुष्या अता पचवायला हवे
सख्य माझ्याशी तुला जमवायला हवे

ऊठ आता जाग तू निद्रिस्त भारता
स्वप्न मरणासन्न हे जगवायला हवे

चांदण्यांचे दागिने मोडीत काढुनी
मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सांग का आहे पुरेसे भिंत पाडणे?
आपल्यामधले चिरे बुजवायला हवे

हे कसे कोठार?... होते सारखे रिते
खाद्य मेंदूला नवे पुरवायला हवे

भंगला एकांत... जमले केवढे बघे
आपले भांडण मना मिटवायला हवे

ह्या व्यथेने त्या व्यथेशी नाळ जोडली
सूत दोघींशी मला जुळवायला हवे

पेरले आहेत मी पैसे चहूकडे
पीक सौख्याचे अता उगवायला हवे

वेळ नाही चेहरा वाचायला तुला
कंप्युटरला लाजणे शिकवायला हवे

Friday, January 29, 2010

कल्लोळ

संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला

एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला

आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळुन पाहिला, मीही पशू माझ्यातला

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला

काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला

शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला

लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमधे
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला