Friday, December 21, 2007

ऋतू येत होते ऋतू जात होते

मायबोलीवर वैभव जोशी ह्यांनी जी गजल कार्यशाळा आयोजित केली होती त्यात मी लिहिलेली ही गजल..


ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी तेच माधुर्य प्रेमात होते

नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो
किती लाघवी तीर भात्यात होते

मुकी राहुनी ही किती बोलली ती
उतरले तिच्या भाव डोळ्यात होते

अता सार्थकी लागला जन्म माझा
तिचे मखमली श्वास श्वासात होते

रुढींची वृथा का तमा बाळगू मी?
मला साथ द्याया तिचे हात होते

तिच्या पासुनी वेगळे मज करावे
कुठे एवढे धैर्य काळात होते?

Tuesday, December 11, 2007

बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला

चाल : बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला

बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला

केवढी भांडी, केवढा राडा
एक-दोन दिवसातून, एकदा खाडा
केवढं दळण, केवढं जळण
डोळं लावलं, तुझ्या वाटंला
थोडे थोडे कपडेही ठेवले धुण्याला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला

मोलकरीण राणी माझी, राणी माझी
लई गुणाची ती गं बाई
लोळागोळा जीव माझा पडला तिच्या पायाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला

हा केरवारा, सारा पसारा
जाईल निघुनी, थांबवा तिला
फरशी-धुणी, केविलवाणी
बगा आतुरली तिच्या स्पर्शाला
येडं, येडं, मन येडं झालं पाहून रखमाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला

----
अवधूत गुप्तेंची बायको मात्र ह्याचे remix गुणगुणेल ह्यात शंका नाही

मूळ गाणे

तुझे देखके मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला
तूने एकबार हसकेच बोला
मन पंछी बनके डोला
तूने मन का द्वार जो खोला
मन कामातूनच गेला

बोला

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
फुलला

अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं
शिंगरू मेलं हेलपाट्याने असं नाही चालायचं

बस एक इशारा कर तू
तेरे लिये जान मैं दे दू
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
तू चाहे तो नाम मैं तेरे
ये आक्खा मुंबई कर दू
तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
भायखल्ला या वडाल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥

कोई मेरा नाम जो पुछे
तेरा नाम बताता हू मैं
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
मेरे घर का भूल के रस्ता
तेरे घर तक आता हू मैं
मेरे यार तेरा दिलदार हुआ
तेरे प्यार मैं बडा निठल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥

तुझे देखके मेरी मधुबाला

------
विडंबन

जब देखा मैं रखमाला
मेरा जीव ये भांड्यात पडला
तिने 'आले बगा' जब बोला
दिल 'रिन' और 'व्हिल' ये झाला
ती लागताच कामाला
मन कामातूनच गेला

बोला...

बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला...

अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं

अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं

बस थोडे बर्तन घास तू
धुणे धू सावकाश तू

(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)

केर निकाल बेडरूम का
फिर टीव्ही देख बिन्दास तू

तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
खानेको नाष्ट्याल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला...

जब काम तेरा मैं देखू
चक्करही मुझे आता हैं

(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)

मेरा नवरा कितने चक्कर
तेरे घर रोज लगाता हैं

मेरी रानी तेरे इंतजार मे तो
हुआ पागल पुरा मुहल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला...

Wednesday, November 21, 2007

मायबोली दिवाळी अंक

मायबोली.कॉम या मराठी संकेतस्थळाचा आठवा दिवाळी अंक ८ नव्हेंबर, २००७ ला, नरकचतुर्दशीच्या दिवशी ’ऑनलाईन’ प्रकाशित झाला. त्या दिवाळी अंकात माझे 'आज रांधण्यात दंग' हे विडंबन प्रसिद्ध झाले आहे. त्याचा दुवा : आज रांधण्यात दंग

तसेच 'मुन्नाभाई चले येरवडा' हा माझा हलकाफुलका लेखही प्रसिद्ध झाला आहे. त्याचा दुवा : मुन्नाभाई चले येरवडा

पूर्ण अंकच वाचनीय आणि श्रवणीय(ही) झाला आहे. तो इथे वाचता येईल : मायबोली दिवाळी अंक

तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा.

Friday, November 2, 2007

गड्याचे श्लोक

गड्याचे श्लोक

चाल : मनाचे श्लोक

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी

मना सज्जना तोच चंडी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे

तिचे पाय रात्री जरासे चुरावे
मका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम

अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती

कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
'मिल्या' सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न नाही करावे

Monday, October 8, 2007

माकडाचा मोबाईल

माकडाचा मोबाईल - एक बालगीत

एक माकड घेऊन आले एकदा मोबाईल
कलरफुल डिस्प्ले होता, लेटेस्ट होती स्टाईल

स्कीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान
रींगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान

माकड पुसे वापरायचाय का तुम्हाला हा फोन
एका कॉलला तीन रुपये एस. एम. एस. ला दोन

दुसऱ्या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर
रोमिंग तेवढे घेतले नाहीये, उगा खर्चात भर

अस्वल म्हणे वाट बघत असेल माझी हनी
फोन करतो 'आलोच मी' काढुन ठेव हनी

मनी आली मिशा चाटत घेउन पैसे नवे
'डायल ए मिल्क' कॉल करुन सांगते दूध हवे

कोल्हा म्हणला माकडदादा होतेय फार बोअर
एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर

ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार
अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार

कुत्रा बोले शेपुट हलवत सांगु का खरंच
आयडीआ का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना हच

इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत
पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत

माकड बोले घाबरु नका! पळताय काय असे?
युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे

हळुच त्याने बंदुकीचा ठो ठो रिंगटोन लावला
घाबरुन तेथुन वाघोबाने लागलीच पळ काढला

वाघोबाची फजिती बघुन हसु लागला जो तो
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ
माकड म्हणले नीट बसा काढू छानसा फोटॊ