जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी
कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी
कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?
Tuesday, November 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
> मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
> इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
>---
मिळूनही मला तुझा नकार गर्भरेशमी ?
श्री मिलिंद छत्रे : तुम्ही पंचचामर वृत्तात इतकी चांगली कविता लिहिल्यावर काही वृत्तभंग करणार्या ओळी घुसडल्या, त्यामुळे बरीच निराशा झाली.
'कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी' ही Olahee पुन्हा लिहून पहा, किंवा ते कडवं सरळ उडवून लावा.
बाकी कविता खूपच छान.
'तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?' चा अर्थ काय? की ते शब्द 'जीवनी हमी' असे अभिप्रेत होते?
अनॉनिमस
इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार.. तुमचे नाव कळले असते तर बरे झाले असते...
मिळूनही मला तुझा नकार गर्भरेशमी ? >>> ह्यामुळे अर्थछटा बदलते... इलाज काय मधून जी अपरिहार्यता येते ती तुम्ही उचविलेल्या ओळीत येत नाही असे वाटते..
श्री मिलिंद छत्रे : तुम्ही पंचचामर वृत्तात इतकी चांगली कविता लिहिल्यावर काही वृत्तभंग करणार्या ओळी घुसडल्या, त्यामुळे बरीच निराशा झाली.
'कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी'>>> हे तुम्ही एका गुरूच्या जागी दोन लघू घेतले म्हणून म्हणत आहात का? हो ही सूट घेतली आहे खरी.. दर्शवून दिलीत म्हणून खूप आभार... टाळायचा प्रयत्न करेन. तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की सांगा
'तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?' चा अर्थ काय? >>> हे जीवनाला उद्देशून म्हटले आहे.
परत एकदा एवढी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
असाच लोभ असावा
एका गुरुऐवजी दोन लघु वापरल्याची उदाहरणं आहेत, पण ज़ुने कवी ही सवलत अपवादाने घेत असत. आता ते प्रमाण खूपच वाढलं आहे,असं मला वाटतं.
(अलिकुलवहनाचे वहन आणीत होते, मधे गुरु वर्णाच्या ज़ागी 'वह' हे दोन लघु वर्ण आहेत.)
> तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की सांगा
>
श्री छत्रे : मला काही सुचण्याची शक्यता कमीच आहे, पण पाहतो काही ज़मतंय का. पण तसा प्रयत्न करण्याआधी म्हणून मी तुमची कविता परत (आणि या वेळेला सावकाश) वाचली. त्यात अर्थाच्या छटा बदलत गेल्यासारख्या वाटताहेत. आणि खरं म्हणजे मला 'गर्भरेशमी' शब्दाचा अर्थ कुठे कळतोय? त्या अर्थावर बरंच अवलंबून आहे. तेव्हा 'गर्भरेशमी' म्हणजे काय? 'गर्भश्रीमंत' म्हणजे खानदानी धनवान, तसं 'गर्भरेशमी नकार' म्हणजे : नकार, पण समोरच्याची भावना समज़ून घरंदाज़ अदबीनी दिलेला नकार? की, एकीकडे 'फितूर श्वास उभ्या जगास बातमी सांगत' असूनही संकोचामुळे दिलेला असा नकार की ज़ो खरं म्हणजे होकार दर्शवतो? की, अज़ून तिसरंच काहीतरी?
- नानिवडेकर
नानिवडेकर गर्भरेशमी वस्त्र म्हणजे एकदम उंची असे रेशमी, देखणे वस्त्र... बघणारा त्यात पार गुंतून जातॊ.. त्याच्या प्रेमात पडेल असे श्रीमंती वस्त्र
तू नकार दिल्यावर खरेतर मी तुझा विचार सोडून देणार होतो... मनोमन तसे ठरविले होते... पण तुझा नकारच असा गर्भरेशमी होता की माझा काही इलाज राहिला नाही.. तू नकार दिलास हे माहित असूनही मी मात्र परत तुझ्यात गुंतलो...
दुसरे असे नम्रपणे सांगावेसे वाटते.. ही गझल असल्याने ती उलगडत नाही तर प्रत्येक शेर (द्विपदी) एक वेगळा अर्थ घेऊन आपल्यासमोर येते.. तिचा आधीच्या किंवा नंतरच्या द्विपदीशी काही संबंध नसतो...
Post a Comment