प्रवेश दुसरा
इकडे पंतप्रधान बाईसाहेबा, श्रीमती संध्या भुवन ह्यांना रजनीलाच आपले रात्रीलाच ही बातमी कळल्याने त्यांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसतो.. अख्या 'त्रिभुवना'त पुण्याची आणि त्यांची नाचक्की होते आहे, लोकं भयंकर संतापली आहेत, 'त्या' रस्त्यावरचेच डांबर त्यांनी फ़ासायला आणले आहे, अशी भितीदायक स्वप्ने त्यांना पडत असतात.. आणि सारखे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत असते.
त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या, विटकरीचे तुकडे वापरुन खड्डे जसे वरवर बुजवतात तसा थोडासा ज्यूस, काही फ़ळे आणि सुकामेवा अशी हलकी न्याहारी करुन त्या पोटातला खळगा वरवर भरतात आणि म . न . पा . कार्यालयाकडे कूच करतात.
तिकडे सगळे मंत्रीमंडळ त्यांची वाटच पहात असते.
पंतप्रधान साहिबा(पं.प्र.सा) : तुम्हाला माहिती आहेच आज एक मोठी गंभिर समस्या आपल्यापुढे आ ऽ ऽ वासुन उभी... खरेतर आडवी आहे. आपण सर्वांनी मिळुन तिला तोंड दिले पाहिजे.. विरोधक संधीचा फ़ायदा घ्यायला टपलेलेच आहेत. ह्या रस्त्याचा दोर करुन ते म . न . पा . चा रस्ता कधी चढतील आणि आपल्याला बाहेरचा रस्ता कधी दाखवतील हे समजणार सुद्धा नाही.. तेव्हा ही समस्या कशी सोडवायची ह्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठ्क बोलाविली आहे.
(एवढ्यात सहाय्यक त्यांच्याकडे एक प्रिंट्-आऊट आणुन देतो. वाचुन एकदम गंभीर होतात..)
पं.प्र. सा. : बघितलेत?!!! काल रस्ता सापडला नाही तर लागले लोक आज बोलायला.. आमच्याविरुद्ध लिहायची कुठल्या वर्तमानपत्रात हिंम्मत नव्हती पण हे इंटरनेट आल्यापासुन जो तो उठतो तो ताळतंत्र सोडून लिहायला लागतो... म्हणजे ह्यांच्यासाठी आम्ही उद्योग पुण्यात आणायचे आणि ह्यांनी ऑफ़िसमध्ये बसुन हे असले उद्योग करायचे...
वाचा!!! वाचा ही कविता. काय मुक्ताफ़ळे झोडली आहेत बघा... एक आडवा न उभा खड्डा काय? पडत्यात काय? खड्ड्यात कुणी कधी पडते का? किती उपहासाने लिहायचे म्हणते मी.
कविता वाचून सर्वच गंभीर होतात...
पं. प्र. सा. : ते काही नाही ह्या लिहिणार्याला मी नंतर बघते. आधी मला ह्या रस्त्यावर काय उपाय करायचा ते सांगा. माझी बुद्धी अगदी काम देईनाशी झाली आहे.
(बुद्धी असेल तर काम देणार ना? असंतुष्ट मंत्र्याचा आवाज)
पहिला मंत्री : माझे आत्ताच अमांत्यांशी बोलणे झाले आहे. त्यांनी तातडीने खोदकाम सुरु केले आहे.
पं. प्र. सा. : ते ठीक आहे हो. पण 'बुंदसे गयी वोह हौद से नही आती' माहिती आहे ना?... उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही मग पावसाळ्यात पूर येईल तेव्हा प्या असे सांगून चालत नाही.. नुस्ता रस्ता खोदून भागणार नाही. लोक आता आंदोलने करतील, पेपरात लिहितील. त्यांना शांत कसे करायचे?
दुसरा मंत्री : (सुडोकुतून डोके वर काढत. हे महोदय जेव्हा पहावे तेव्हा सुडोकु घेउन बसलेले असतात)एक उपाय आहे. संमती असेल तर सांगतो..
पं. प्र. सा. : अहो संमती कसली घेताय इथे माझी मति कुंठित झालीय.. सांगा लवकर
दु. मं. : अहो जे आपण दिल्लीत वापरले तेच गल्लीतही वापारायचे.. ह्याला त्यागाचे राजकारण म्हणत्यात (मंत्री महोदयांना मधुनच गावरान मराठी बोलायची खोड आहे)
पं. प्र. सा. : हे बघा असे कोड्यात बोलु नका.. तुमचे ते सुडोकु इथे नको.. डोकु आपलं डोके चालेनासे झालेय अगदी. तेव्हा नीट, सपष्ट, सुद्ध मराठीत सांगा.
दु. मं : (महत्व मिळाल्याने खुशीत येत) अगदी शुद्ध मराठीत सांगतो.. अहो दिल्लीला आपल्या म्याडमने नाही का रेझिगनेशन दिले होते मागे... तसेच तुम्ही पण रेझिगनेशन द्या.
पं. प्र. सा. : (रागावुन) तोंड संभाळुन बोला!! माझा राजिनामा मागताय? तुम्हाला वाटलेच कसे मी राजी होईन म्हणून?
दु. मं : अहो म्याडम जरा नीट ऐकुन तर घ्या... आता विरोधक तुम्हाला सळो की पळो करुन सोडतील. तुमचा राजिनामा मागतील, काम रोखुन धरतील, मिठाईतला वाटा वाढवुन मागतील.. त्यांची तोंडे बंद करायला हा एकच उपाय आहे.. त्यांनी राजिनामा मागायच्या आधीच तुम्हीच घोषाणा करा चार दिवसात रस्ता नाही उखडला तर राजिनामा देईन म्हणुन...
पं. प्र. सा. : अहो पण चार दिवसांनी खरेच राजिनामा द्यायला लागला म्हणजे?
दु. मं. : अहो असे होणारच नाही.. आपला जाहिरनामा खरा असतो का? तसेच हा राजिनामा.. नुसती घोषणा करायची राजिनामा देणार आणि नंतर नामानिराळे व्हायचे... चार दिवसात खोदकाम पूर्ण होईलच तोपर्यंत विरोधकांनाही आपण शांत करु.. वाटल्यास पूरग्रस्तांना वाटायला जी मदत आलीय केंद्राकडुन त्यात त्यांनाही वाटा देउन टाकू?
पं. प्र. सा. : हा हे एकदम बेस्ट आहे... सेक्रेटरी एक छानसे राजिनामापत्र लिहुन आणा बघु...
दु. मं : (हळुच) पण तेवढे माझे मागणे लक्षात ठेवा.. तुमचा कार्यकाल संपला की माझी शिफ़ारस करण्याचे..
पं. प्र. सा. : अगदी बिनघोर रहा. हा रस्त्याचा प्रश्ण सोडवायला राजेसाहेब स्वत: जातीने येत आहेत संध्याकाळी. त्यांच्या कानावर घालिन मी हे, संध्याकाळच्या बैठकीत.
क्रमश:
----------
Monday, June 18, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment