Thursday, April 17, 2008

तू

आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू

उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू

भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू

सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू

पाखरे निजती तुझ्या खांद्यावरी
स्वप्नं त्यांची फुलविणारी बाग तू

नाव जर भवसागरी तारायची
दु:ख ने! ओझे सुखाचे त्याग तू

शोध स्वत्वाचा तुला जर घ्यायचा
काढ माझ्या पावलांचा माग तू

6 comments:

Nash said...

मस्तच गझल, मिल्या!!! जीवन-पाणी स्वप्न-जाग हे विरोधभास आवडले!! लिखते रहो!!

मोरपीस said...

मला फ़ार आवडलं आपलं लिखाण

vivek said...

मिलिंद,

गझल कालच वाचली होती (सुरेश भटांच्या संकेतस्थळावर बहुतेक). पण कार्यबाहुल्या कॅबरे करत असल्याने अभिप्राय लगेच टंकवू शकलो नाही.

गझल जबरदस्तच आहे गड्या.

उसळण्याचे विसरलेल्या सागराची आणि स्वप्नातल्या वचनपूर्तीची कल्पना फारच उत्तम.

समभागासारख्या व्यावहारिक जगातल्या संज्ञेचा यमक म्हणून वापर करायच्या कल्पनेला साष्टांग दंडवत.

ऎसेही लिखते रहो भिडू

Anonymous said...

CHHANACH ZALIYE GAZAL.

MAGACHYA VELI TU GAZAL BADDAL MAHITI DILYANE VACHAYALA AAVADALI.

मिलिंद छत्रे said...

नचिकेत, मोरपिस, विवेक, राकेश खूप खूप धन्यवाद

Anonymous said...

नमस्कार मिलिद ,
गजल छान आहेत.
बरहा बद्दल हार्दिक आभार !!
नविन काही लिहल की जरुर साग.