Friday, May 16, 2008

जीवघेणे

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे

लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?
रोजचे ते खार खाणे जीवघेणे

आठवांचा खण उघडताना मिळाले
दाखले काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर स्पंदनांचे
छेडतो मॄत्यू तराणे जीवघेणे

4 comments:

Unknown said...

लोणच्यागत खार खाणे जीवघेणे...खरोखर अप्रतिम..

प्राची कुलकर्णी said...

milind, aajch vaachalaa tujhaa blog. mastch aahe re kavitaa. aataa vel milel tasa sara blog vaachun kaadhen.

मिलिंद छत्रे said...

खूप आभार अंजली आणि प्राची...

प्राची तू मायबोलीवरचीच प्राची ना.. पूर्ण ब्लॊग जरूर वाच आणि नक्की प्रतिक्रिया दे..

अंजली : तूम्ही पण मायबोलीवर असता का?

अभिजीत दाते said...

मिलिंद, सुंदर रचना..!

मग मलाही मोह आवरला नाही...!
म्हणून या माझ्याही दोन ओळी..

"पिंजर्‍याला सोडुनी जा पाखरा तू,
वेचतो आहेस दाणे, जीवघेणे..!"

असेच लिहित रहा...

अभिजीत
http://dilkhulas.wordpress.com