Friday, January 29, 2010

कल्लोळ

संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला

एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला

आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळुन पाहिला, मीही पशू माझ्यातला

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला

काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला

शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला

लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमधे
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला

3 comments:

Naniwadekar said...

Too many diverse themes crammed into the poem. Nevertheless, it's a great effort.

"लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमधे
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला"

Beautiful lines.

- dn

M. D. Ramteke said...

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला>>>

वरिल ओळीतर फारच आवडल्यात.

मिलिंद छत्रे said...

धन्यवाद नानिवडेकरजी, मधुकर