Tuesday, June 19, 2007

खडडयाधीन आहे शहरी!!! (भाग 3)

प्रवेश तिसरा

लोकांचा क्षोभ वाढत आहे... वर्षानुवर्षे खड्यातून प्रवास करुन त्यांना त्याची इतकी सवय झाली आहे की सरळ रस्त्यातून गाडी चालविणे अगदी अशक्या झाले आहे त्यांना.. इतकी सवय झालीय की त्यांनी घरीसुद्धा खास जमिनीला उंचसखलपणा देणारी खास कार्पेट्स अंथरुन घेतली आहेत. कित्येक multI national कंपन्यांनी आपल्या ऑफ़िसमध्येही तशीच व्यवस्था केली आहे. (ही कार्पेट्स बनवण्याचा कारखाना अर्थातच एका नेत्याच्या मेहुण्याचा आहे) पुण्यात असेच अजुन रस्ते सापडले किंवा खड्डे बुजले गेले, तर काय? ह्या विचाराने लोक हवालदिल झाले आहेत..

इकडे पुण्यातील हाडवैद्यांना मात्र आनंदाची उकळी फ़ुटली आहे.. असेच अजुन काही सरळ रस्ते सापडले तर त्यांच्या धंद्याला बरकत येणार असल्याने ते रस्त्यांना पाठींबा देण्यासाठी सरळ खड्यांमध्ये उतरले आहेत मोर्चा घेउन.. त्यांचे नेतृत्व हाडाचे हाडवैद्य असलेले Dr. हाडलावे करत आहेत.

म . न . पा . चे ठेकेदारही गप्प बसलेले नाहीयेत.. असेच सगळीकडे रस्ते दिसु लागले तर त्यांचा पोटापाण्याचा मार्गच बंद व्हायचा अशी भिती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे तेही खड्ड्यात उतरले आहेत... पुण्यातले सगळेच खड्डे आज गजबजुन गेले आहेत...

इकडे बाहेर असा गदारोळ सुरु असतानाच राजेसाहेबांच्या बंगल्यावर त्यांचा दरबार भरला आहे. राजेसाहेब 'च. ल. दाढीकर' स्वत:ची दाढी कुरवाळत चिंतातुर चेहर्याने बसले आहेत.

पं.प्र.सा. आणि इतर निवडक मंत्री हजर आहेत.

राजेसाहेब (रा. सा.): आज सकाळीच मला सेक्रेटरींनी बातमी वाचुन दाखविली. ऐकुन मला सांस्कृतिक धक्काच बसला (पुण्यातला धक्का सुद्धा सांस्कृतिक असतो.).. संध्याबाई, तुम्हाला पुण्याचे पंतप्रधानपद देउन आम्ही दिल्लीला गेलो ते ह्याच साठी? आता तुम्हीच सांगा हे आमचे खायचे आपले खेळायचे दिवस आहेत ना.. मग? आम्ही फ़ेस्टीवल कडे लक्ष द्यायचे का खड्ड्यांकडे? असेच जागोजागी रस्ते दिसु लागले तर पुण्यात उद्योग कसे येणार?.

अहो लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे आपण अख्खे पुणे खड्डामय केले की नाही. अगदी धावपट्टी सुद्धा सोडली नाही मग हे नविन काय? अगदी माझ्या गल्लीत सुद्धा मागच्या वर्षी मी आलेलो तेव्हा ६९३ खड्डे होते. आज फ़क्त ६९२ पूर्णांक तीन चतुर्थांश खड्डे आहेत... हे कसे? आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यांना काय उत्तर द्यायचे आम्ही?

पं.प्र.सा. : महाराज काळजी नसावी... ह्यावर उपाय आहे. (कानात हळुच राजिनाम्याविषयी सांगतात).

रा. सा. : वा वा आमच्या तालमीत चांगल्या तयार झाला आहात की... वा वा.. (खुषीने दाढी कुरवाळु लागतात)

मॅडम एवढ्याने भागणार नाही. अजुन एक काम करा. 'ढुंढते रह जाओगे' योजना जाहिर करा आणि लोकांना सांगा की 'सरळ रस्ता कळवा आणि पन्नास हजार रुपये मिळवा' ही बघा आजच ही कविता नेटवर मिळाली आहे.. तुमच्या नावाने हिची पत्रके काढुन सगळीकडे वाटा. म्हणावे जिथे जिथे रस्ता दिसेल तिथे तिथे, मी (म्हणजे तुम्ही संध्याबाई) जातीने हजर राहिन खोदण्यासाठी. आणि मी (म्हणजे तुम्ही संध्याबाई) स्वत: प्रयत्न करेन रस्ते शोधण्याचा.

घ्या छापा ही कविता ....

चाल : दिसला गं बाई दिसला

लाचेनं माखलेली कुदळ हाती
आले मी ठेकेदार घेऊन साथी
रस्त्यात पडं, पाय बियं मोडं, नाही आम्हाला ही भिती
पुण्याचा प्रॉब्लेम, उद्योगांचा दुश्मन
कुठं दिसना मला, गं बाई बाई कुठं दिसना मला!
इथं दिसनां, तिथं दिसनां
शोधु कुठं?, शोधु कुठं?, शोधु कुठं?

दिसला गं बाई दिसला,
दिसला गं बाई दिसला
मला बघुन थोडासा खचला, गं बाई खचला

गडी अंगानं हाय लई लुकडा
त्याचा खडीनं माखलाय मुखडा
थोडासा वाकडा, इवलासा तुकडा
डोळ्यामंदी खुपला, गं बाई बाई, डोळ्यामंदी खुपला

दिसला गं बाई दिसला
मला बघुन थोडासा खचला, गं बाई खचला

माझ्या राजाची गेली रया
त्याला पाहुन येतिय दया
हातपाय तुटका, मधेच फ़ुटका
फ़ावडा उरी घुसला, गं बाई बाई, फ़ावडा उरी घुसला

दिसला गं बाई दिसला
मला बघुन थोडासा खचला, गं बाई खचला

पुण्यनगरीची न्यारी अदा
सत्ता खड्ड्यावर झाली फ़िदा
मिळेल पैका चढेल धुंदी
नेता दाढित हसला, गं बाई बाई, नेता दाढित हसला

दिसला गं बाई दिसला
मला बघुन थोडासा खचला, गं बाई खचला

-----------------

रा. सा. : सेक्रेटरी आता नीट काळजीपूर्वक लिहुन घ्या.. "Elephant God Festival" ची वेळ साधुन "खड्ड्यात्मका खड्डेश्वरा" ही दहा कलमी योजना जाहीर करा

१. पुण्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेउन काही अतिशय जुन्या खड्ड्यांना आम्ही ऐतिहासिक नावे देऊन जतन करण्याचे ठरवले आहे... शनिवारवाड्याच्या शेजारी त्याच्याएवढाच मोठ्ठा असा जो खड्डा आहे त्याचे नामकरण 'पहिला बाजिराव खड्डा' असे करा आणि मुख्यमंत्री महोदयांना उद्घाटनाला बोलवा...तसेच ह्याच खड्ड्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक जलतरण तलाव, 'मस्तानी तलाव' ह्या नावाने बांधण्यात येईल अशी घोषणा करा..

२. विमानतळाशेजारी जो खड्डा आहे तो बराच खोल आहे.. त्याचे नामकरण 'दुसरा बाजिराव खड्डा' असे करा आणि येरवडा जेल मधल्या सर्व कैद्यांना तिकडे शिफ़्ट करा.. तो इतका खोल आहे की कुणीच पळुन जाऊ शकणार नाही आणि जेलमुळे फ़ुकटची अडलेली मोक्याची जागा बिल्डर लोकांना विकता पण येईल.

३. सिंहगड रस्त्यावरील मोठ्ठ्या खड्याला 'तानाजी मालसुरे खड्डा' नाव द्या. तो खड्डा N.D.A. ला त्यांच्या cadets ना अवघड असे प्रशिक्षण द्यायचे असेल तर उपयोगी पडेल इतका विविधतेने नटलेला आहे

४. स्वारगेट चौकातील खड्ड्याला 'स्व. राजीव गांधी खड्डा' असे नाव द्या. तिथे आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेचे आयोजन करता येईल

५. लालमहाला जवळच्या खड्ड्याला 'दादोजी कोंडदेव खड्डा' असे नाव द्या.. त्यात तरुणांसाठी घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र सुरु करता येईल... माझ्या मेहुणीच्या चुलत दिराच्या साडुकडे भरपूर घोडे आहेत. त्याला ते केंद्र चालवायला देता येईल.

६. खराडी येथला खड्डा अजुन थोडा खोदायची गरज आहे. तिथे चांगली खाण तयार होईल... न जाणो तिथे जर हिरे सापडले तर सगळ्यांचीच चांदी होईल.

७. कुदळी, फ़ावडे, पहारी अश्या हत्यांरांच्या कारखान्यांना अनुदान मिळावे म्हणुन मी सरकार दरबारी प्रयत्न करीन असे अश्वासन द्या.
(खासगीत - कुणाकुणाला आपल्या नातेवाईकाच्याअ नावे कारखाने काढायचे आहेत त्यांनी मला नंतर भेटा)

८. काही काही खड्डे इतके लांब, रुंद आहेत की त्यांच्यावर पूल बांधायची गरज आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात याव्यात. म्हणजे जनतेची (आणि आपलीही) चांगली 'सोय' होईल

९. काही काही खोल खड्डे आतुन एकमेकांशी छान जोडले गेले आहेत. त्यांचा अभ्यास करुन त्यामधुन मेट्रो चालु करण्यात येईल असे जाहीर करा

१०. पुण्यातल्या टेकड्यांवरची झाडे बिल्डर लोकांनी नष्ट केल्याने प्रेमी युगुलांची फ़ार पंचाईत झाली आहे. पण काही खड्डे असे आहेत की ज्यांच्यामध्ये झाडे उगविली आहेत. अश्या खड्ड्यांना develop करुन छानशी उद्याने तयार करा.. त्या बागांना अनुक्रमे म. गांधीं पासुन सुरुवात करुन, पं . नेहरु, इंदिरा गांधी, राजिव गांधी उद्यान अशी नावे द्या.. त्यातुन उद्याने उरलीच तर संजय गांधी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर ही नावे वापरा... चुकुनही सावरकर, टिळक, भगतसिंग ह्या नावांचा उल्लेख नको.

अश्या रितीने सर्व योजना कागदावर जाहीर झाल्या. जनता नेहमीप्रमाणेच भुलली... नेत्यांच्या सोयीच्या काही योजना आमलात आणायला सुरुवात झाली. सुरुवातीला जनतेने आवाज उठविला, मोर्चे काढले, वर्तमानपत्रात लिहिले, कुणी विनोदी लिहिले तर कुणी गंभीर, कुणी चिमटे काढले तर कुणी ताशेरे ओढले. पण हळुहळु जनता सर्व विसरुन गेली. अंधेर नगरी परत चाचपडत, अडखळत खड्ड्यातुन रोजचा दिनक्रम करु लागली आणि चौपट राजेसाहेबही आपल्या विमानात बसुन एका शिष्टमंडळासोबत परदेशी निघुन गेले.

---------- पदडा पडतो ---------------

पाठीमागे सूत्रधार जनतेचे गार्हाणे गाऊ लागतो

चाल : पराधीन आहे जगती

दर वर्षी खड्डे पडता, दोष पावसाचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा
दोष पावसाचा

माय म . न . पा . ना दोषी, ना दोषि लोकराजा
खड्यामधुन ऑफ़िसयात्रा करे नित्य प्रजा
खेळ चालला से आमच्या, शूद्र ह्या जीवाचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

अंत उन्नतीचा पतनी, होई ह्या पुण्यात
सर्व उद्योगांचा वत्सा, नाश हाच अंत
खोदण्यार्थ रस्ता बनतो, नेम म . न . पा . चा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

रस्त्यासवे जन्मे खड्डा, जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे, मार्ग नाशवंत
काय शोक करीसी वेड्या, मोडक्या हाडांचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

कैक स्वर्गवासी झाले, कैक अंथरुणात
चोळे मीठ जखमेवरती, राजा अकस्मात
'शरम' कल्पनेशी थांबे, कोश ह्या नेत्यांचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

मिठाई न खाता सुटला, कोण प्राणीजात?
लाचमुक्त जगला का रे, कुणी म . न . पा . त?
ठेकेदार जे जे बोले, तोच मार्ग साचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

दोन खंदकांची होते, रस्त्याखाली भेट
एक कुदळ तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तोचि आहे मजुरा, थर डांबराचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

नको आसु ढाळू आता, पूस लोचनास
खड्यातून आहे आता रोजचा प्रवास
व्यय होतसे रे आपल्या भरलेल्या कराचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

नको आग्रहाने तिजला, बोलवूस व्यर्थ
खड्डे बुजले घोषित करुनी, झाली ती कृतार्थ
राजिनामा नाट्य हे मोठ्ठा, खेळ 'त्रिभुवनी'चा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

संपल्याविना ही वर्षे, पाच, काम काय?
पुण्यास ह्या नाही येणे, 'फ़ेस्टीवल' शिवाय
तूच एक भोगी आता, 'खाड्य'संपदेचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा

पुन्हा नका येऊ कोणी, दूर ह्या पुण्यात
उद्योगांना नाही थारा, खड्ड्यांच्या जगात
मान वाढला रे लोकी, पुण्यपत्तनाचा
खड्ड्याधीन आहे शहरी, पुत्र हा पुण्याचा


----- समाप्त ------

No comments: