Monday, June 18, 2007

खडडयाधीन आहे शहरी!!! (भाग १)

मागच्या वर्षी पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून मी हे 'पथ'नाट्य लिहिले होते...
बघुया ह्यावर्षीही हाच अनुभव येणार का सुधारणा होणार ते बघुयाच...
----

खड्ड्याधीन आहे शहरी!!! ... एक पथ(?)नाट्य

पडदा उघडतो आणि सुत्रधार सांगु लागतो.

सुत्रधार : पुण्यनगरीत एकच खळबळ माजली आहे.... सगळीकडे एकच चर्चा (चर्चा आणि मोर्चा [घराकडे मोर्चा वळविणे ह्या अर्थी] हे पुणेकरांचे जन्मसिद्ध हक्क आहेत)...कोथरुड असो की कात्रज, मुंढवा असो की कोंढवा, हिंजवडी असो की हडपसर (नाव कसे सार्थ आहे नाही? हाडं पसर). बीपीओ म्हणू नका, आय.टी. (आयती पगार देते ती आयटी) म्हणू नका की सरकारी ऑफ़िसेस म्हणू नका सगळीकडे एकच बातमी लोक चघळत आहेत. पुण्यातील एका अग्रगण्य दैनिकाने पुरातत्व खात्याच्या मदतीने एक शोध लावला आहे... तळजाई ते कात्रज असा एक पेशवेकालीन रस्ता सापडवून त्यांनी मनपाचा अगदी कात्रज केला आहे.

प्रवेश पहिला

पुण्याचे प्रशासनही खडबडुन जागे झाले आहे... अमात्य श्री बधीर ह्यांनी तातडीने सर्व सरदार, भालदार, चोपदार, सेवक ह्या सर्वांची बैठक बोलावली आहे. अमात्यांना गहन प्रश्ण पडला आहे की अशी आगळीक झालीच कशी? खड्डा नसलेला एक रस्ता पुण्यनगरीत सापडतो म्हणजे काय? मिठाई खाउनदेखील असला अक्षम्य गुन्हा? त्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. कुठल्यातरी खड्ड्यात जाउन लपावे असे त्यांना वाटु लागले आहे. आता ह्या समस्येतून (मार्ग कसा काढावा) खड्डा कसा खोदावा ह्याचा विचार ते करु लागले आहेत. तातडीने त्या भागातील खड्ड्यांची काळजी वहाणारे मुकादम खडीवाले आणि अभियंता श्री कुदळे ह्यांना बोलावणे धाडतात.

अमात्य : खडीवाले मी हे काय ऐकतोय?

खडीवाले : (तोंडातल्या गुटख्याच्या पिंकेने बाजुच्याच गालिच्यावर नक्षीकाम करत) काय ऐकता आहात?

अमात्य : अहो मी तुम्हाला विचारतोय? मी ऐकले ते खरे का?

खडीवाले : (त्याच मख्ख चेहर्‍याने पुन्हा एक पिंक टाकत) आता साह्येब मला वो काय माहिती तुम्ही काय ऐकले.. आम्हाला थोडाच ठेकेदाराकडुन mp3 प्लेयर असलेला लेटेश्ट मोबाईल मिळाला आहे? त्यावर तुम्ही काय ऐकता? काय ऐकले न ऐकल्यासारखे करता... आम्हाला काय ठावं? (मोबाईल आणि बाईलही.. हळुच पुटपुटतो.. तरी सर्वांना ऐकु जातेच)

अमात्य : (गडबडुन) बरं बरं!!! काय वाटेल ते काय बोलता? तुमच्या जिभेला काही हाड?

खडीवाले : साह्येब तेवड्ये हाड सोडुन बोला...कालच माझी 'होंडा शिटी' खड्ड्यातून जाताना मध्येच एक सरळ रस्ता आला त्यात अडकली आणि माझे कंबरेचे हाड मोडलेय बगा. अजुन दुखतेय..... हा नक्कीच त्या डांबर्‍याचा डांबरटपणा असणार बगा... त्याचाच एरीया होता बगा.

अमात्य : त्या डांबर्‍यांकडे मी नंतर बघुन घेईन.. आधी तुमच्या एरीआत म्हणे एक अख्खा खड्डाहीन रस्ता सापडला हे खरे आहे का ते सांगा?

खडीवाले : (ओशाळवाणे हसत) आता साह्येब...

तेवढ्यात कुदळे तोंड उघडतात...

कुदळे : साहेब मी सांगू का?

अमात्य : (रागाने) अहो सांगा की. उघडा की थोबाड.. मगाचपासुन नुसते भूत बघितल्यागत चेहरा करुन उभे आहात.

कुदळे : (महत्प्रयासाने बोलु लागतात) साहेब अहो मी तिकडूनच येतोय... असला गुळगुळीत रस्ता आहे ना की मी, तोंडघशीच पडलो. पूर्ण जबडा दुखतोय बघा बोलताना.... साहेब एकवेळ तुम्ही भूत पाहिले असेल पण असला रस्ता कधी पाहिला नसेल पुण्यात..

अमात्य : अहो मग तोंड वर करुन काय सांगताय?

कुदळे : साहेब जबडा दुखतोय ना.. म्हणुन तोंड वर करावे लागतेय बोलताना

अमात्य : (वैतागुन)... म . न . पा . च्या शाळेत शिकलात का हो तुम्ही?.. अहो जरा जनाची नाही तर मनाची बाळगा... खाल्या 'मिठाई'ला तरी जागा म्हणतो मी!!!

कुदळे : अहो साहेब तोच तर प्रॉब्लेम झाला ना. मिठाई खायला न मिळाल्यानेच घोटाळा झाला हा..

अमात्य : म्हणजे? आणि घोटाळा शब्द वापरु नका. आसपास पत्रकार असले म्हणजे? सुतावरुन स्वर्ग गाठतात लेकाचे.

खडीवाले : साह्येब तुम्हाला string operation म्हणायचेय काय? मग तसं बोला ना सरळ.

अमात्य : (डोक्याला हात लावतात) कुदळे तुम्ही बोला...

कुदळे : साहेब त्याचे काय आहे?... हा रस्ता आहे ना तो कुणी कंत्राटदाराने पेशवेकाळात बांधला.. आता तो आम्हाला मिठाई कशी देणार सांगा? त्याच्याकडुन मिठाई घ्यायची म्हणजे आम्हालापण..... ('वर' बघतात आणि हसायचा प्रयत्न करतात पण कळवळल्यापलीकडे काही करु शकत नाहीत)
मिठाई नाही मिळाली तर मग आम्ही तिकडे देखरेखीसाठी फ़िरकणार तरी कसे ना? तुम्हीच सांगा... त्यातून तिकडे लोकांची वहिवाट नसल्याने अशी वाट लागली बघा...

अमात्य : ओके.. पण ठेकेदारांना जवाब मला द्यावा लागतो त्याचे काय? काय सांगू त्यांना मी? मी काय सर्वेसर्वा नाही. माझीही काही जबाबदारी आहे. मी ही बांधिल आहे कुणालातरी उत्तर द्यायला.

कुदळे : साहेब एवढे एक वेळ संभाळुन न्या की... परत असे नाही होणार

अमात्य : बर बर बघतो... रात्री बंगल्यावर एक मिठाईचे बॉक्स पाठवुन द्या म्हणजे झाले.. च्यायला घोळ तुम्ही करायचा आणि निस्तरायचा आम्ही.. बर आता ह्यावर उपाय काय करणार ते बोला?

कुदळे : हे काय आत्ता जातो साहेब मुकादम, मजुर आणि हत्यारे घेउन आणि खोदकामास सुरुवात करतो बघा.. चार दिवसात नाही तळजाईचा तळ गाठला तर नावाचा कुदळे नाही.

अमात्य : ठीक आहे. जा कामाला लागा...

बैठक संपते

-------- क्रमश:

3 comments:

Anonymous said...

milind, afetr very 2 years i get chance to visit pune, but the situation of Khaddas u have mention is maintained...A realastic humar...A good one ...jai pune! jai punekar! Jai pune maha nagar palika.

मिलिंद छत्रे said...

धन्यवाद पल्लवी.. खूप दिवसांनी हे कुणीतरी वाचले आणि प्रतिक्रीया पण दिली हे बघून बरे वाटले..

prakash said...

मस्त आहे...मजा आली वाचून !

~प्रकाश