चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले
दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
Thursday, January 29, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment