Sunday, September 6, 2009

इतकेच मला जाताना

प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
’माय नेम इज खान’ म्हणूनच गोर्‍याने छळले होते

ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते

मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का?
मी पैसे ’कोल्ह्याकडुनी’ आधीच उकळले होते

त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली?
लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते?

स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते

माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे
करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते?

झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या
पाऊल घसरले होते डोकेही चळले

ही हझल मायबोली गणेशोत्सवात ऐकता पण येईल

Monday, February 16, 2009

संपवून टाक पेग

चाल : मालवून टाक दीप

संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट
बेवड्या किती दिसांत, लागले सुरेस ओठ

ह्या इथे नसानसात, झिंगते अजून रात
हाय! तू गमावलीस एवढ्यात का विकेट?

गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’

दूर दूर ह्या पबात, बैसलो निवांत पीत
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लूट

हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट

काय हा तुझाच र्‍हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट

बेवड्या किती दिसांत लागले सुरेस ओठ

Thursday, January 29, 2009

स्वप्न एखादे जणू...

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले

Wednesday, November 26, 2008

मेघ आषाढातही आटेल आता

मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता

काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता

पेच माझी ’मी’ पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!

साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता

सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता

जन्मत: मी फाटका होतो तसाही
शोक का मग जर कफ़न फाटेल आता?

मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?

तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता

जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता

Tuesday, September 9, 2008

जिंदगी

जशी जिंदगी ढळू लागली
काळसावली छळू लागली

कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली

शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली

गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली

अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली